कडेगाव : वडीयेरायबाग (ता. कडेगाव) येथे शासनाच्या विविध योजना व सेवा थेट ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान समाधान शिबीर’ शनिवारी (दि. १४) उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. वांगी मंडळातील सहा गावांसाठी जिल्हा परिषद शाळा, वडीयेरायबाग येथे आयोजित या शिबिराला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

या शिबिराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी रणजित भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी तहसीलदार अजित शेलार, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, निवासी नायब तहसीलदार महेश अनारसे, निवडणूक नायब तहसीलदार सागर कुलकर्णी,युवा नेते हर्षवर्धन कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच वांगी मंडळातील जिल्हा परिषद सदस्य
प्रियांका महाडीक ,पंचायत समिती सदस्य राजकुवर सूर्यवंशी,सरपंच
मनिषा कांबळे, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक आणि तहसील कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिरामध्ये महसूल विभागाच्या १५ प्रकारच्या सेवांसह ग्रामविकास, वन विभाग, दुय्यम निबंधक, महिला व बालकल्याण, आरोग्य विभाग, सेतू केंद्र, पुरवठा विभाग तसेच कृषी विभागाच्या योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ देण्यात आले. सातबारा उतारा दुरुस्ती, जिवंत ७/१२ अंतर्गत सातबारा वाटप, पीएम किसान, अॅग्रीस्टॅक, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी पेन्शन योजना, रोजगार हमी योजना आदी सेवांचा लाभ नागरिकांनी मोठ्या संख्येने घेतला.

शिबिरात विविध प्रलंबित कामांचा वेगाने निपटारा करत नागरिकांना दिलासा देण्यात आला. अनेक वर्षे प्रलंबित असलेली महसूल व शासकीय कामे जागेवरच निकाली काढल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. शासनाच्या योजना व सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरामुळे नागरिकांची अनेक प्रलंबित कामे तत्काळ मार्गी लागल्याने परिसरात समाधानाचे वातावरण दिसून आले.

क्षणचित्रे :
वडीयेरायबाग समाधान शिबिरातील लाभांचा आढावा :
विविध दाखले वाटप – ४७०
वारसा फेरफार – ७२७
विविध प्रकरणे (एकुम्या, अपाक, नाव बदल, लक्ष्मीमुक्ती, तगाई कमी) – १२५६
प्रलंबित फेरफार निकाली – ८२
सातबारा दुरुस्ती – १७
संगांयो व इंगायो लाभ – १९
रेशनकार्ड व अन्नसुरक्षा लाभ – ८२
पाणंद रस्ते फेरफार – ७२
डिजिटल सातबारा – १०८२
डिजिटल ८-अ – ३५०
वन विभाग प्रकरणे – ६
भूमी अभिलेख – ९६
आयुष्मान आरोग्य कार्ड – १४
आधार कार्ड वाटप – २७
एकूण लाभ : ४३२०
महसूल वार्ता वृत्तसेवा सांगली

