मंगळवेढा : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान राबविण्यात येत असून मंगळवेढा तालुक्यात दिनांक 7 मार्च पासून या अभियानाचा शुभारंभ होत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सर्व सेवांचा लाभ जनतेला एकाच छताखाली मिळावा व या निमित्ताने महसूल यंत्रणा प्रत्येक गावापर्यंत पोहचावी या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान राबविण्यात येत आहे.
मंगळवेढा तालुक्यात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, अपर जिल्हाधिकारी गणेश निराळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, प्रांताधिकारी बी.आर.माळी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 7 मार्च रोजी मंगळवेढा व बोराळे मंडळासाठी जोगेश्वरी मंगल कार्यालय मंगळवेढा याठिकाणी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे शिबीर घेण्यात येणार आहे.
त्याचबरोबर दिनांक 14 मार्च रोजी जिल्हा परिषद शाळा आंधळगाव, 10 एप्रिल रोजी सिध्दनाथ मंगल कार्यालय पाटखळ, 17 एप्रिल रोजी हनुमान विद्यालय मरवडे, 8 मे रोजी जिल्हा परिषद शाळा भोसे व 15 मे रोजी नगर परिषद शाळा क्रमांक 2 मंगळवेढा येथे हे शिबीर राबविण्यात येणार आहे.
या शिबिरामध्ये प्रामुख्याने प्रलंबित फेरफार विषयक कामकाज, 7/12 मधील चुकांची दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे 7/12 आणि 8 अ उताऱ्यांचे वाटप, उत्पन्न, रहिवासी आणि जातीच्या दाखल्यांचे वितरण, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, अकृषक परवानगी व नवीन तरतुदीबद्दल मार्गदर्शन, नवीन अकृषक तरतुदीनुसार सनद प्रक्रिया बाबत मार्गदर्शन, संजय गांधी योजना विभागामार्फत सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूर करणे, विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप, तुकडेबंदी कायद्याच्या प्रकरणांचा निपटारा, पाणंद रस्त्यांच्या बद्दल कार्यवाही, घरांसाठी पट्टे वाटप, ई-मोजणी अर्ज, ॲग्री स्टॅक आणि पीएम किसान नोंदणी, भूसंपादन व अकृषक परवानगी प्रकरणी कमी जास्त पत्रक तयार करणे, पुरवठा विभाग विषयक कामकाज, घरकुल लाभार्थ्यांसाठी मोफत वाळू वाटप व महसूल विभागाच्या वतीने दिला जाणाऱ्या सर्व सेवांचा लाभ नागरिकांना या शिबिराच्या माध्यमातून एकाच छताखाली घेता येणार आहे.
मंगळवेढा तालुक्यातील शिबिरांचा शुभारंभ आमदार समाधान आवताडे यांच्या शुभ हस्ते शनिवार दिनांक 7 मार्च रोजी होणार असून या कार्यक्रमास सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी तसेच प्रांताधिकारी बी.आर.माळी व इतर विभागाचे सर्व अधिकारी सुद्धा उपस्थित राहणार आहेत.
‘महसूलची वारी, शेतकऱ्यांच्या दारी’ हे ब्रीद वाक्य घेऊन सुरू करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा लाभ तालुक्यातील सामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, महिला असे सर्वांनी घ्यावा असे आवाहन तहसीलदार मदन जाधव यांनी केले आहे.

