टीम महसूल वार्ता
खरसुंडी : ज्यांच्या ध्येयाला जिद्दीचे पंख लाभलेले असतात ते संघर्षातून आपले अस्तित्व निर्माण करतात. मिटकी तालुका आटपाडी येथील प्रवीण उत्तम कोळपे यांनी हे आपल्या कर्तुत्वातून दाखवून दिले आहे.

भारतातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत प्रवीण कोळपे यांनी आपल्या जिद्द, परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर ५८४ व्या रँकने उत्तीर्ण होत इतिहास घडवला आहे. ग्रामीण भाग, साधनांची कमतरता, घरची परिस्थिती, मार्गदर्शनाचा अभाव असली कुठीलीही कारणे न सांगता कोणत्याही पोरीस्थितीत हार न मानल्यास यश आपल्याकडे खेचून आणता येते हे प्रवीण यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
प्रवीण यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले असून माध्यमिक शिक्षण श्री सिद्धनाथ विद्यालय खरसुंडी येथे तर त्यानंतरचे शिक्षण सांगली व कराड या ठिकाणी झाले आहे.

प्रवीण यांनी आपल्या यशाचे श्रेय आईवडील, शिक्षक आणि मार्गदर्शक व आपल्या मित्रांना दिले. आई वंदना कोळपे व भाऊ प्रमोद कोळपे यांनी प्रवीण यांना प्रत्येक प्रसंगात आधार व धीर दिला आणि प्रवीण यांनी सुद्धा अफाट मेहनत करून त्यांच्या कष्टाचे सार्थक करून दाखवले.
प्रवीण यांच्या यशाने ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, आपणही लवकरच अशा परीक्षा उत्तीर्ण होऊन मोठ्या पदावर जाण्याच्या त्यांच्या स्वप्नांना नवे पंख मिळाले आहेत.
प्रवीण यांच्या यशाबद्दल आटपाडी तालुका व सांगली जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

